
ज्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुकीचा निकाल लागला, मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका निघायला हव्या हत्या. पण सन्नाटा होता. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. काय आहे हे, हे कसं झालं? असा कसा निर्णय आला, असे म्हणत मनसे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकाल आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्यांच्याही मनाला निकाल पटलेला नसल्याचं मला दिसलं. ते म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जिता होगा. कोणीतरी जिंकलं असेल की ज्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला, हे कसलं द्योतक आहे? काही काही गोष्टींवर तर विश्वासच बसू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात अनेक असे निकाल आहेत ज्याच्यावर निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलो आपण. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. ही त्यांची आठवी टर्म होती. सातवेळा जो नेता 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून याचे ते बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत झाले. मीच काय अख्खा महाराष्ट्र बलतोय. जे निवडून आले, सत्तेत आले, त्यांतील अनेकांचे मला फोन आले. त्यांना शॉक बसलाय. भाजपला समजू शकतो 132 जागा. अजित पवार 42 जागा? चार-पाच जागा येतील की नाही? असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. जे महाराष्ट्रात इतकी वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले. ज्यांच्या जीवावर अजित पवार, भुजबळ मोठे झाले. त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
काय झालं, कशामुळे झालं? हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, हे तुम्ही कुठेही मनात धरू नका. लोकांनी मतदान केलं. पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर, निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या, असे राज ठाकरे म्हणाले.