रेल कामगार सेनेचे उद्या अधिवेशन, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील रेल कामगार सेनेचे भव्य वार्षिक अधिवेशन गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी दादर इन्स्टिटय़ूट (पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्र. 5 च्या बाजूला) येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असून रेल कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कोकण आणि मध्य रेल्वेमध्ये नुकत्याच झालेल्या मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीत रेल कामगार सेनेच्या पाठिंब्यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाला अभूतपूर्व यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता रेल कामगार सेनेचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती असणार आहेत. यावेळी ते रेल कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया अधिवेशनात आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, सीआरएमएसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वाजपेयी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाला रेल कामगार सेनेच्या सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रेल कामगार सेनेचे (मध्य रेल्वे) सरचिटणीस दिवाकर देव यांनी केले आहे.