
अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरा धरणाजवळ दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांपैकी एक पोलीस हा मिंधे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा बॉडीगार्ड असल्याचे उघड झाले आहे. दरोडेखोर सोनारांकडून 1 कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समाधान पिंजारी व दीप गायकवाड यांच्यासह पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी सुभाष साबळे यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस विकी सुभाष साबळे हा पोलीस अंमलदार शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांचा बॉडीगार्ड आहे.
समाधान पिंजारी याने नागपूर येथील सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांच्याशी काही दिवसांपूर्वी संपर्प साधला. शंकर पुळे याच्याकडे 7 किलो सोने असून 5 कोटी रुपयांमध्ये देतो, असे हुलगे यांना आमिष दाखविले. स्वस्त दरात सोने मिळत असल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1 कोटी 50 लाख रुपये घेऊन हुलगे, दीप गायकवाड व इतर मंडळी एका कारमधून अलिबागकडे निघाले. तीनविरा धरणाजवळ आल्यावर गायकवाडने कार थांबविली. पोलीस आले आहेत, असे सांगून फिर्यादी व त्यांचा सहकारी यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. त्यानुसार ते गाडीतून उतरले. त्याचवेळी दीप गायकवाडने कार सुरू करून तेथून पळ काढून पनवेलच्या दिशेने पळ काढला.