
मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठय़ा थकबाकीदारांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला असून पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने ‘डीबीएस रिऑलिटी कंपनी’च्या चांदिवली येथील 178 कोटी 64 लाखांच्या 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. कारवाईनंतर पुढील 21 दिवसांत कंपनीने करभरणा केला नाही तर या मालमत्तांचा लिलाव केला जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
महापालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
पालिकेला लिलाव करण्याचा अधिकार
कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठय़ा थकबाकीदारांना पालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. दिलेल्या मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम 203, 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीजवस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे.