भरधाव सिमेंट बल्करची पाच वाहनांना धडक; बोरघाट दोन तास ठप्प

सिमेंट वाहून नेणारा भरधाव बल्कर पाच वाहनांवर धडपून बोगद्यात आडवा झाल्याने आज पहाटे बोरघाट ब्लॉक झाला. मिसिंग लिंकला जोडण्यात येणाऱया नव्या बोगद्यात हा विचित्र अपघात झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर साधारण सकाळी सहा वाजता मुंबई लेनवरची वाहतूक पूर्वपदावर आली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपास जवळ पहाटे 4 च्या सुमारास मुंबई बाजूला नवीन बोगद्यामध्ये 5 वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मुंबई लेनवरील वाहतूक 2 तास ठप्प झाली होती. सिमेंट वाहून नेणाऱया बल्करच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात बल्करचा चालक किरकोळ जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.