बेस्टने मृतांच्या नातेवाईकांना दिली दोन लाखांची मदत, कुर्ला बेस्ट बस दुर्घटना

कुर्ला येथे डिसेंबर महिन्यात बेस्ट बसने चिरडल्यामुळे 9 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील तीन मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून आज प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात आली. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्या हस्ते धनादेश नातेवाईकांना सोपवण्यात आले.

कुर्ला येथील स. गो. बर्वे मार्ग येथे 9 डिसेंबरला रात्रीच्या सुमाराला बेस्ट उपक्रमातील पंत्राटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे मार्गावरील 40 वाहनांना आणि पादचा-यांना धडक दिली. या दुर्घटनेत 49 जण जखमी झाले. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात मृत्युमुखी 9 व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार, 9 मृतांपैकी आफरीन शहा, इस्लाम अन्सारी आणि मेहताब शेख यांच्या नातेवाईकांना दोन लाखांचा धनादेश बेस्ट महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्या हस्ते देण्यात आला.