सिद्धार्थ रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रात सुविधांची वानवा, शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या शवविच्छेदन केंद्रात अनेक सुविधांची वानवा आहे. यासंदर्भात शिवसेनेने या केंद्राची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच येथील गैरसोयी तत्काळ दूर करण्याची मागणी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास सुरू आहे. या प्रकल्पातील नव्याने बांधण्यात आलेले शवविच्छेदन केंद्र काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे; परंतु या शवविच्छेदन केंद्रात काम करताना येणारे प्रश्न स्थानिकांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासमोर मांडले. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी तत्काळ विधानसभा समन्वयक समीर देसाई, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, माजी नगरसेवक राजू पाध्ये, राजू राजपूत, विनोद माने यांच्यासह या केंद्राची पाहणी केली.

शासनाचे अधिकारी व महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता (इमारत व बांधकाम) यादव यावेळी उपस्थित होते. सदर प्रकल्पातील प्रश्नांवर तत्काळ लक्ष घालून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन केंद्रातील कर्मचारी व स्थानिक जनतेला देण्यात आले.