
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधुदुर्गातील सुरंगीच्या फुलांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुरंगीच्या झाडाखाली साडय़ा अंथरून त्यात पडणाऱया सुरंगीच्या फुलांचा सडा गोळा केला जातो. राज्याच्या वन खात्याने या व्हायरल व्हिडीओवरून प्रेरणा घेतली असून समृद्धी महामार्गापासून राज्याच्या वनक्षेत्रात सुरंगीचे वन उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे.
कोकणात सुरंगीच्या गजऱयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तरुणीच्या केसात माळण्यापासून देवीला सुरंगीच्या फुलांच्या गजरे वाहण्याची पद्धत आहे. मध्यंतरी सिंधुदुर्ग जिह्यातील सुरंगीच्या फुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुरंगीच्या झाडाखाली पसरलेल्या साडय़ांमध्ये सुरंगीची फुले गोळा करणाऱया महिला दाखवल्या होत्या. या व्हिडीओवरून प्रेरित होऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी वनांमध्ये सुरंगीच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे.
900 वनक्षेत्रात सुरंगीची लागवड
वन खात्याच्या अखत्यारितील 900 वनक्षेत्रात सुरंगीची लागवड करण्यात येणार आहे. सध्या वन खात्याकडे सुरंगीची पाच हजार झाडे आहेत. सुरंगीच्या बियांपासून नवीन रोपं तयार करण्यात येणार आहेत. वनक्षेत्रात सुरंगीची झाडे लावण्याची योजना असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
वन खात्याचे आर्थिक गणित
सुरंगीच्या झाडांचे वनीकरण करून वन खात्याला आर्थिक फायदा होणार आहे. एका मोठय़ा झाडापासून दरवर्षी 30 ते 35 किलो सुरंगीचा कळा मिळतो. याचा भाव अडीचशे ते तीनशे रुपयांपासून थेट सहाशे रुपये किलोपर्यंत जातो. एका कुटुंबाला यातून हंगामाला पन्नास हजार ते सहा-साडेसहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
फेब्रुवारी-मार्चमध्ये बहर
सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. हे झाड 70 ते 80 वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत सर्वसाधारणपणे दोन बहरात फुलते. याच्या खोडालाच कळय़ा येतात. परागकण मोठय़ा प्रमाणावर असणाऱया सुरंगीच्या पिवळसर पांढऱया फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. सिंधुदुर्गात बहराला आलेली झाडे नैसर्गिकरीत्या उगवलेली आहेत.