शिवसेनेचा दहिसर वॉर्ड ऑफिसवर ‘हंडा मोर्चा’! पाणीपुरवठा विस्कळीत, अशुद्ध पुरवठा, रहिवाशांचे प्रचंड हाल

दहिसरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यास कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना विभाग क्र. 1 च्या वतीने ‘आर/उत्तर’ दहिसर कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढून पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

संपूर्ण मुंबईभरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वॉर्ड ऑफिसवर धडक देण्याचे निर्देश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. यानुसार आज विस्कळीत पाणीपुरवठा आणि प्रस्तावित कचरा कर, कचऱ्याचे ढीग, रस्त्यांची अपूर्ण कामे, नालेसफाईमधील दिरंगाईबाबत शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली दहिसर येथील ‘आर/उत्तर’ पालिका कार्यालयावर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला.  याप्रसंगी बोलताना विनोद घोसाळकर म्हणाले की, शिवसेनेच्या आंदोलनामुळे नुकतेच भगवती रुग्णालयाचे खासगीकरण पालिकेने रद्द करून महापालिकेनेच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर व विभाग संघटक शुभदा शिंदे यांनी केले होते. याप्रसंगी माजी नगरसेवक हर्षद कारकर, योगेश भोईर, सुजाता पाटेकर, विधानसभा प्रमुख बाळपृष्ण ढमाले, अशोक म्हामुणकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत, उदय सुर्वे, सचिन शिर्पे, संजय ढोलम, उपविभाग संघटक दीक्षा कारकर, दीपा चुरी, अमिता सावंत, रोशनी गायकवाड, सोनाली विचारे आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा तातडीने सुधारा

पश्चिम उपनगरामध्ये जलबोगद्यातून पाणीपुरवठा होत असूनही सध्या उभ्या राहत असणाऱ्या टोलेजंग इमारतीमुळे बैठय़ा चाळी व झोपडपट्टीवासीयांना आवश्यक पाणी मिळत नाही. नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून पावसाळय़ापर्यंत नालेसफाई पूर्ण न झाल्यास दहिसर नदीलगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दहिसर मध्ये 91 ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून ही सर्व कामे 31 मेपूर्वी पूर्ण करावीत, कामांच्या दर्जाची आयआयटीकडून तपासणी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.