धारावी बचाव आंदोलन समितीची आज जनसभा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्षे राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबईबाहेर फेकण्याचा कट केंद्र, भाजप आणि अदानी समूहाची एनएमपीडीए कंपनी करत आहे. मात्र, धारावीकर कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत. धारावीकरांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरूच राहणार असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी धारावीत विशाल जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. धारावी बचाव आंदोलन समितीने शिवराज मैदानात संध्याकाळी 6 वाजता ही सभा होईल.

धारावीकरांना विश्वासात न घेता, त्यांच्या मनाविरोधात अदानी समूहाचा पुनर्विकास प्रकल्प धारावीकरांवर लादण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या आडून अदानी मुंबईतील सुमारे 2 हजार एकरची जागा बळकावणार असून धारावीकरांबरोबरच मुंबईकरांनाही याचा फटका बसणार आहे. या सर्वांना विरोध करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समितीच्या वतीने धारावीकरांमध्ये जनजागृती करण्यात येत असून महाराष्ट्र दिनी विशाल जनसभा शिवराज मैदानावर होणार आहे. सभेला समितीचे नेते बाबूराव माने, समन्वयक अॅड. राजेंद्र कोरडे यांच्यासह कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह धारावीकर मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.