
मुंबईतील अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 400 शिक्षकांना मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शाळांमध्ये सामावून घ्या. अन्यथा 2 मे रोजी मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयांबाहेर धरणे आंदोलन करू असा इशारा शिक्षक सेनेने दिला आहे.
या शिक्षकांची पालघर, रायगड येथील दुर्गम भागातील शाळांमध्ये बदली करण्यात आली आहे. यात 90 टक्के महिला आहेत. दुर्गम भागात बदली करण्यात आल्याने अनेक महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे त्यांचे बदली आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून केली आहे.
मुंबईतील जवळपास 400 अतिरिक्त शिक्षकांना 28 एप्रिल रोजी बदलीचे आदेश मिळाले. त्यांना कार्यमुक्त न केल्यास मे महिन्यापासून वेतन रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. यातील अनेकांची 15 ते 20 वर्षे सेवा झाली आहे. काही निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. अशातच त्यांचे पालघर, ठाणे, रायगड येथील दुर्गम भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यात तब्बल 90 टक्के महिला आहेत. त्यामुळे या शिक्षकांना मुंबई, ठाणे अथवा नवी मुंबईत येणाऱया शाळांमध्ये सामावून घेण्याची मागणी अभ्यंकर यांनी केली आहे.