पाकिस्तानने हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढली, कराची हवाई तळावर 25 चीननिर्मित लढाऊ विमाने तैनात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाली असून हल्ल्याच्या भीतीने ग्वादर बंदराची सुरक्षा वाढवली आहे. बुधवारीच पाकिस्तानचे सूचनामंत्री अताउल्लाह तरार यांनी हिंदुस्थान 24 तासांत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती व्यक्त केली होती. त्याच्या दुसऱया दिवशी त्यांनी समुद्री मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक केल्याचे चित्र आहे. त्यानुसार कराची हवाई तळावर 25 चीननिर्मित जे 10 सी आणि जेएफ 17 लढाऊ विमाने तैनात केली. ही विमाने हल्ल्याची स्थिती निर्माण झाल्यास काही मिनिटांत ग्वादर बंदरावर पोहोचू शकतात.अमेरिकेकडून मिळालेले एफ 16 ही लढाऊ विमानेही पाकिस्तानने सज्ज ठेवली आहेत.

उत्तर आणि उत्तर पूर्व भागात लष्कर आणि हवाई दलाच्या हल्ल्याची भीतीही पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानने बलुचिस्तानमधील पासनी, गिलगिट बाल्टिस्तानच्या स्कार्दू आणि खैबर पख्तूनख्वाहचे स्वॉट एअरबेस सक्रिय केले आहेत. येथून विमानांची उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. हिंदुस्थानी नौदलाने अरबी समुद्रात सराव सुरू केला असून कोणत्याही कठीण परिस्थितीला किंवा हल्ल्याला तोंड देण्यासाठी युद्धनौकांना सतर्क ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआय प्रमुख

आयएसआय या गुप्तचर तपास यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे हा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर आणि हिंदुस्थानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी रॉचे प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती केल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानचा भालापटू नदीमसह कलाकारांचे इस्टा अकाऊंट ब्लॉक

पाकिस्तानचा ऑलंपिक सुवर्णपद विजेता भालापटू अर्शद नदीम याच्यासह कलाकार, अभिनेते, अभिनेत्री यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहेत. कलाकारांमध्ये माहिरा खान, हानिया आमिर, सनद सईद आणि अली जाफ, बिलाल अब्बास, इक्रा अझिझस आयेझा खान, इम्रान अब्बास आणि सजाल अॅली यांचा समावेश आहे. दरम्यान, अभिनेता फवाद खान याच्या अबीर गुलाल या सिनेमावर हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर, बसीत अली आणि शाहीद आफ्रिदी यांचे यूटय़ूब चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे बंद

शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्यानंतर अटारी आणि वाघा बॉर्डरवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत होती. आज दोन्ही देशांच्या या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूण 125 पाकिस्तानी नागरिक बुधवारी अटारी आणि वाघा बॉर्डरद्वारे माघारी गेले. गेल्या सात दिवसांत एकूण 911 पाकिस्तानी नागरिक माघारी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानी व्हिसावर गेलेले 15 हिंदुस्थानी नागरिकही बुधवारी मायदेशी परतले.

एलएल ध्रुव हेलिकॉप्टर पुन्हा लष्कर, हवाई दलाच्या ताफ्यात

शत्रूला धडकी भरवणारे अॅडव्हान्स ऑपरेशनल वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने याबाबतची घोषणा केली आहे. यापूर्वी तांत्रिक कारणांमुळे हे हेलिकॉप्टर तात्पुरते वापरातून बाद करण्यात आले होते. या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. तपासणी दरम्यान आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर त्या आता ही हेलिकॉप्टर्स वापरासाठी सुरक्षित आणि योग्य असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.