तहव्वूर राणाच्या आवाजाचे, हस्ताक्षराचे नमुने घेण्याची एनआयएला परवानगी

मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्याची परवानगी आज दिल्ली उच्च न्यायालायने एनआयएला दिली. विशेष एनआयए न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी याबाबतचा निर्णय दिला. राणाच्या एनआयए कोठडीत सिंह यांनी आणखी 12 दिवसांची वाढ केली आहे. तहव्वूर राणा हा मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी डेव्हीड कोलमन हेडली याचा अत्यंत जवळचा मित्र आहे.

हाफीज सईदचे नेटवर्क अजूनही सक्रीय

हाफीज सईद आणि आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. हाफीज सईदचे नेटवर्क अजूनही सक्रीय आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयाला दिली. लष्कर ए तोयबाच्या कार्यवाहीची माहिती उघड करण्यासाठी राणाची आणखी काळ कोठडी हवी आहे, अशी मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली.