
आयपीएलच्या प्रारंभी पाचपैकी चार सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या मुंबईने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना राजस्थानचा 100 धावांनी धुव्वा उडवत सलग विजयांचा षटकार ठोकला. यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पाच आणि सहा विजय नोंदवणारा मुंबई पहिलाच संघ ठरला आहे. या धडाकेबाज विजयानंतर तळाला असलेल्या मुंबईने 14 गुणांसह तालिकेत प्रथमच अव्वल स्थान काबीज केले. या विजयामुळे मुंबईचे प्ले ऑफ स्थान जवळजवळ पक्के झाले, मात्र गतवर्षी प्ले ऑफ खेळलेल्या राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. चेन्नईपाठोपाठ राजस्थान स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरला आहे. या यादीत तिसरे नाव हैदराबादचे असू शकते.
मुंबईच्या फलंदाजांचाच खेळ
राजस्थानसाठी आज जिंकू किंवा मरू अशी स्थिती असतानाही त्यांच्या खेळाडूंमध्ये जोश नव्हता. राजस्थानने टॉस जिंकल्यानंतरही मुंबईच्या फलंदाजांना बाद करणे त्यांच्या गोलंदाजांना जमलेच नाही. रोहित शर्माने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखताना आज रायन रिकल्टनसह 116 धावांची शतकी सलामी दिली. रिकल्टनने 38 चेंडूंत 61 धावा चोपताना 3 उत्तुंग षटकार लगावले. तो बाद झाल्यानंतर रोहितही बाद झाला. पण त्याने आपले स्पर्धेतील तिसरे अर्धशतक साजरे केले. मात्र या खेळीत रोहितने फक्त नऊ चौकार ठोकले. आज त्याने एकही षटकार ठोकला नाही. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडयाने पुढील 7 षटकांत 94 धावा ठोकत संघाला द्विशतकापारही नेले. दोघांनी प्रत्येकी 23 चेंडूंत 48 धावा काढल्या. तसेच 4 षटकार आणि 10 चौकार मारत अभेद्य भागी रचली.
राजस्थानी फलंदाजांची शरणागती
मुंबईचे 228 धावांचे आव्हान राजस्थानच्या फलंदाजांना हिमालयासारखे भासले. गेल्या डावात घणाघाती आणि विश्वविक्रमी शतक झळकावून खळबळ माजवणार्या वैभव सूर्यवंशीचा अडसर डावाच्या चौथ्या चेंडूवरच दीपक चहरने दूर केला. वैभव शून्यावरच बाद झाला. त्यानंतर ट्रेंट बोल्टने यशस्वी जैसवाल (13), नितीश राणा (9) यांची विकेट काढत राजस्थानची 3 बाद 41 अशी अवस्था केली. यानंतर राजस्थानच्या सर्वच आघाडीवीरांनी शरणागती पत्करल्यामुळे मुंबईने दहाव्या षटकांतच सामना आपल्या खिशात घातला होता. 9 बाद 91 नंतर जोप्रा आर्चरने 30 धावांची खेळी करत संघाला 117 पर्यंत नेले. बोल्टनेच आर्चरची विकेट काढत मुंबईच्या शंभरनंबरी विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई जेतेपदासमीप…?
पाच आणि त्यापेक्षा अधिक सलग विजय मुंबईसाठी सातत्याने जेतेपद मिळवून देणारे ठरले आहे. आयपीएलचे आकडे तेच सांगत आहेत. 2013, 2015, 2017 आणि 2020 या चारही जेतेपदांमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे, ते म्हणजे मुंबईने सलग पाचपेक्षा अधिक सामनेही जिंकलेत आणि जेतेपदावरही नाव कोरलेय. अपवाद फक्त 2019 सालचा. यावर्षी मुंबईने सलग पाच सामने न जिंकताही जेतेपद संपादले. तसेच 2008 साली सलग सहा विजयांचा षटकार ठोकल्यानंतरही मुंबई साखळीतच बाद झाली होती.