
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आपल्याला ठाऊक असतो, पण ज्याप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे वैशाख शुद्ध नवमीला सीतानवमी साजरी केली जाते. महाराष्ट्रात सीतानवमी साजरी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, पण उत्तर भारतात, खास करून बिहार, झारखंड या भागात आणि नेपाळमध्येही सीतानवमी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. यंदा 5 मे रोजी सीतानवमी साजरी होणार आहे. म्हणून त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सीतेच्या जन्माच्या गोष्टीकडे पाहावे असे वाटले.
तशी सीताजन्माची गोष्ट साधीच आहे, पण ती सांगितली आहे वाल्मीकी रामायणामध्ये बालकांडाच्या 66 व्या सर्गात. जिथे राम आणि लक्ष्मण शिवधनुष्य पाहायला उत्सुक आहेत म्हणून जनक राजा त्यांना ते दाखवत आहे. हे शिवधनुष्य त्यांच्या राजघराण्यातील देवरात राजापासून त्यांच्या घरी देवांनी ठेव म्हणून ठेवले आहे. त्याची कथा अशी की, दक्ष यज्ञाच्या प्रसंगी शिवशंकर अतिशय क्रुद्ध झाले होते. त्यांना देवांनी त्यांचा हवि दिला नाही या अन्यायाने ते देवांवर चिडले आणि हे धनु त्यांनी धारण केले, पण देवांनी क्षमा मागितल्यावर आसुरी शक्तींचा संहार करण्यासाठी हे धनुष्य त्यांनी देवांना दिले, जे देवांनी देवरात राजाकडे सोपवले असा इतिहास जनक राजा अभिमानाने सांगतो आणि जो या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल अशा वीराला आपली कन्या सीता देण्याचा आपला विचार आहे, असेही नमूद करतो. इथे तो सीताजन्माची गोष्ट सांगतो की, एके दिवशी मी यज्ञभूमी नांगरत असताना मला एक तान्ही मुलगी मिळाली. ती नांगरताना सापडली म्हणून मी तिचे नाव सीता ठेवले. ( ‘सीता’ या शब्दाचा शब्दश अर्थ नांगरणी करणे असाच होतो) इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, सीताजन्माची तिथी सांगितलेली नाही, पण परंपरेत ती रूढ आहे. त्याचा स्रोत काय हा संशोधनाचा विषय ठरावा.
पुढे राजा सांगतो की, तिला मी प्रेमाने मोठे केले, तिची कीर्ती सर्वत्र पसरली. तिला प्राप्त करण्यासाठी अनेक तरुण राजे तिला मागणी घालायला येऊ लागले. पण सीता वीर्यशुल्का असेल असे मी ठरवले. वीर्य म्हणजे पराक्रम. पराक्रम दाखवून तिला जिंकावे लागेल. आता आपल्याला जनकाचा सीतेच्या लग्नासंदर्भात असलेला ‘पण’ तर ठाऊक असतो, पण सीतेच्या स्वयंवराची गोष्ट जशी आपल्याला ठाऊक असते तशी वाल्मीकी रामायणात नाही. मुळात एके दिवशी सीतेच्या स्वयंवराचे आयोजन केले असे घडलेले नाही. आपल्यासमोर चित्र असते की, एकाच सभामंडपात सर्व राजे जमले आहेत. तिथेच रावणही आला आहे. राम-लक्ष्मणही आहेत. सर्व राजे प्रयत्न करून असफल होत आहेत. रावणाची तर मोठी फजिती होते. एखाद्या गोष्टीत रावण नसतो, पण फजिती होणारे इतर राजे असतातच आणि मग प्रभू श्रीराम पुढे सरसावतात वगैरे.
वाल्मीकी रामायणात या प्रसंगाचे वर्णन वेगळे आहे. एकदा अनेक राजांनी एकत्र येऊन या प्रकारचा प्रयत्न केला आणि स्वतची फजिती करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला सहसा ठाऊक नसलेला एक प्रसंग सांगितला आहे की, जनक राजाने असा ‘पण’ ठेवून आपला अपमान केला या भावनेने क्रोधित होऊन सर्व राजांनी मिथिलेवर आक्रमण केले. तिला वेढा घातला. एक वर्ष हा संघर्ष सुरू होता. शेवटी रसद संपू लागली. आता काय करावे, असा प्रश्न जनक राजासमोर होता. तेव्हा देवांनी त्याला चतुरंग सैन्य दिले व त्याने वेढा मोडून काढला.
सीतेचे आयुष्य कायम संघर्षमय राहिले आहे. ती भूमिकन्या आहे. भूमी ज्याप्रमाणे संघर्षाचे कारण ठरते तशीच तीही संघर्षाचे कारण ठरली आहे. एक राजकुमारी म्हणून आपल्यासाठी हा असा संघर्ष सुरू असलेला पाहून तिला काय वाटले असेल? तिचा जन्म अयोनिज म्हणून दिव्य खरा. तो खास असला तरी सुखद नक्कीच नव्हता, पण यातही तिने आपल्या चारित्र्याचे धवलपण जपले म्हणूनही ती सीता ठरते. कारण ‘सीता’ या शब्दाचा एक अर्थ ‘शुभ्रधवल रंग’ असाही होतो.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)