26/11 Mumbai terror Attack – NIA ने तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे घेतले नमुने

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील कथित सूत्रधार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने शनिवारी एनआयएने गोळा केले. राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याच्याकडून विविध अक्षरे आणि संख्यात्मक अक्षरे लिहून हस्तलेखनाचे नमुने घेण्यात आले.

विशेष एनआयए न्यायालयाने अलिकडेच राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) 26/11 चा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने मिळविण्याची परवानगी दिली. राणाचा आवाज आणि त्याच्या हस्तलेखनाचे नमुने सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या आदेशाचे पालन त्याने केल्याचे राणाचे कायदेशीर मदत पुरवणारे वकील अ‍ॅडव्होकेट पीयूष सचदेव यांनी सांगितले.

सोमवारी, न्यायालयाने तहव्वुर राणा याची राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) कोठडी आणखी 12 दिवसांसाठी वाढवली आहे. राणाकडे 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड आणि पुरावे असल्याची माहिती एनआयएने सुनावणीदरम्यान न्यायालयाला दिली. तसेच राणा चौकशीदरम्यान टाळाटाळ करत होता आणि तपासात सहकार्य करत नव्हता. त्यामुळे राणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी कोठडीची आवश्यकता असल्याचा एजन्सीने युक्तिवाद केला. हल्ल्यांमध्ये त्याच्या कथित सहभागाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी राणाची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचे एजन्सीने अधोरेखित केले.