
गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 70हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून लईराई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी पहाटे यात्रेला गालबोट लागले.
दरवर्षी हजारो लोक या यात्रेत सहभागी होतात. यात्रेच्या पहिल्याच दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यापैकी पाच भाविकांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना पहाटे घडली असून जखमींना शेजारील म्हापसा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये, प्रेमेंद्र शेठ, निळकंठ हळर्णकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, गोवा सरकारने शिरगाव गावातील दुर्घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘‘या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळी गेलो. जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. लईराई जत्रेत दरवर्षी 50 हजारांहून अधिक भाविक सहभागी होतात. घडलेली ही एक दुर्दैवी घटना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून घटनेची माहिती घेतली. त्यांनी केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. आम्ही पुढील 3 दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत,’’ असेही ते म्हणाले.
थिवी येथील तिघांचा मृत्यू
शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत थिवी येथील नात्यातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आदित्य कवठणकर (17, अवचीतवाडो), तनुजा कवठणकर (52) आणि यशवंत केरकर (40, माडेल, थिवी) यांचा समावेश आहे.