हिंदुस्थानी बंदरावर पाकिस्तानी जहाजांना बंदी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. पाकिस्तानची सर्वबाजूने नाकेबंदी सुरू केली आहे. पाकिस्तानसाठी हिंदुस्थानी हवाई हद्द बंद केल्यानंतर आता हिंदुस्थानी बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना प्रवेशबंदी घातली आहे. यासंदर्भात जहाज बांधणी महासंचालनालयाने आदेश जारी केला आहे. पाकिस्तानचा ध्वज असणाऱ्या जहाजांना हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षा आणि देशहितासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

पाकिस्तानकडून ‘अब्दाली’ची चाचणी

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर पाकिस्तान आणखी बिथरला आहे. पाकड्यांनी शनिवारी अब्दाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची घाईघाईत चाचणी केली. 450 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. अब्दाली वेपन सिस्टिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी ‘एक्सरसाईज इंडस’ या सैन्य सरावाअंतर्गत करण्यात आली. पाकड्यांकडून जाणूनबुजून हे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

फारुख अब्दुल्लांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडित सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या घरी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, शाह एक हुतात्मा आहे. त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याने बंदुकीला न घाबरता माणुसकी दाखवली. आम्हाला दहशतवाद्यांशी सामना करायचा आहे. दहशतवाद्यांनी मानवतेची हत्या केली असून त्यांच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडे आहेत. ते स्वर्गात जाऊच शकत नाहीत. दरम्यान, अब्दुल्ला यांनी मात्र हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईवर भाष्य करण्यास नकार दिला.

सहा महिन्यांचा शस्त्रसाठा निर्माण करा, चंद्रपूरच्या आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला तणाव पाहता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता भासू नये यासाठी देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून चंद्रपूरच्या आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय सहा महिन्यांचा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठल्याने केंद्र सरकारने भ्याड हल्ल्याचा हिशेब चुकता करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या असून युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता भासू नये यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. चंद्रपूर जिह्यातील भद्रावती येथेही आयुध निर्माणी असून त्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आधी मंजूर झाल्या. त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भद्रावती आयुध निर्माणीत पिनाका नावाचे मिसाईल, 155 बोफोर्स सेल, 81 एम एम मार्टर आणि ग्रेनेडस् निर्मिती केली जाते. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे आदेश मिळाल्याने भद्रावती आयुध निर्माणी कामाला लागली आहे.