
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 100 दिवसांच्या परीक्षेत धोरणात्मक बाबींच्या कार्यक्रमात 100 टक्के गुण मिळवून पास झालेले अनेक विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या मार्च महिन्याच्या परीक्षेत मात्र काही विभाग नापास तर काही विभागांची सुमार कामगिरी झाल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गृह विभागाची मात्र आपले सरकार पोर्टलवर सरासरी 11 ते 23 टक्के कामे प्रलंबित आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची कामगिरी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर मार्च महिन्यात आणि मुख्यमंत्र्यांच्याच सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने दर महिन्याला मंत्रालय मासिक सुधारणा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. मार्च महिन्यातील या अहवालात विविध विभागांच्या कामगिरीत अनेक विभाग नापास झालेले दिसून येतात. मार्च महिन्याच्या अहवालात सामान्य प्रशासन विभागाने आपले सरकार या पोर्टलवरील प्रलंबित कामांची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात अनेक विभाग मागे पडलेले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या प्रगतीपुस्तकात 100 गुण
मुख्यमंत्र्यांच्या कृती आराखडा कार्यक्रमाच्या फलनिष्पत्ती अहवालात 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम यामध्ये गृह विभाग, जलसंपदा विभाग, पशुसंवर्धन विभाग, बंदरे, उच्च व तंत्रशिक्षण कामगार, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक, दुग्ध व्यवसाय या विभागांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर ऊर्जा विभागाला 98 टक्के, उद्योग विभागाला 97 टक्के, महसूल विभागाला 96 टक्के, शालेय शिक्षण विभागाला 94 टक्के, अन्न व औषध प्रशासन विभागाला 92 टक्के, मदत आणि पुनर्वसन विभागाला 90 टक्के, विमान चालन विभाग 89 टक्के गुण मिळालेले आहेत.
मासिक सुधारणा अहवालात पिछाडीवर
सामान्य प्रशासन विभागाने आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित कामांची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात कारागृह विभागाची 23 टक्के तर अबकारी शुल्क विभागात 11 टक्के कामे प्रलंबित आहेत. जलसंपदा 22 टक्के, पशुसंवर्धन 64 टक्के, उच्च व तंत्रशिक्षण 11 टक्के, वस्त्रोद्योग 36 टक्के, सांस्कृतिक 73 टक्के, दुग्ध विकास 64 टक्के, ऊर्जा 10 टक्के, उद्योग 24 टक्के, महसूल 12 टक्के, शालेय शिक्षण 14 टक्के, अन्न व औषध प्रशासन तसेच मदत व पुनर्वसन 37 टक्के, कौशल्य विकास रोजगार 72 टक्के, महिला व बाल विकास 9 टक्के आणि कृषीची 14 टक्के कामे प्रलंबित आहेत.