
लग्नाच्या वरातीहून परतत असतानाच पाच जणांवर काळाने झडप घातली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात हवाई दलाच्या जवानासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुनील कुमार पटेल (35), रवी कुमार पटेल (38), चांदबदन (36) आणि हवाई दलाचे जवान विकास कुमार (38) अशी मयतांची नावे आहेत. अमित कुमार असे जखमी चालकाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील पिपरी पोलीस स्टेशन परिसरातील गुग्वाबाग वळणाजवळ हा अपघात झाला. गाडीतील सर्वजण प्रयागराजच्या धूमनगंज येथे लग्नाच्या वरातीसाठी गेले होते. तेथून परतत असताना शनिवारी मध्यरात्री अतिवेगामुळे गुग्वाबाग वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी जांभळाच्या झाडावर धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला.