सूर्य आग ओकतोय, पारा चाळिशीपार, मुंबईही तापली; पारा 35 अंशांवर

राज्यभरातही पारा चाळिशीपार गेला असून चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याची सुरुवात एप्रिलपासूनच झाली असून गेल्या दोन महिन्यांत मार्चच्या तुलनेत एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक ठरल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ 43 जळगाव, नांदेड, सोलापूर 42, धाराशीव आणि परभणी 42, नगर 40, अकोला 42, संभाजीनगर 40 तर बीडमध्ये 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईतही मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड उकाडा आणि उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी रेल्वे, बस आणि इतर वाहनांमधून प्रवास करताना उष्णतेच्या अक्षरशः झळा बसत असल्याचे चित्र आहे. मुंबईत पारा 35 अंशांवर गेला आहे. चेंबूर आणि कुलाब्यात 35, बोरिवली, 33, मुलुंड, पवई आणि सांताक्रुझ 34, तर वरळीत 33 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

एप्रिलमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू; सापडले 71 रुग्ण

एप्रिल महिन्यात उष्माघाताचे 71 रुग्ण सापडले तर तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती उघड धाली आहे. उष्माघातामुळे अनेकांना अतिसार, उलट्या, डोकेदुखी, डिहायड्रेशन, त्वचाविकार यांसारख्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यवतमाळमध्ये उष्माघाताचे 17, बुलढाणा 12, नागपूर 10, जालना 8, परभणी 6, चंद्रपूर आणि गडचिरोलीत 5, धुळे, पालघर, रायगडमध्ये प्रत्येकी 4, लातूर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 3, जळगाव, कोल्हापूर, नाशीक, वर्धा आणि वाशीममध्ये प्रत्येकी 2, धाराशीव, पुणे, सांगली, सातारा, ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला.

काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला

मे महिन्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून या महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे. त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे, दुपारी 12 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून द्रवपदार्थ जास्तीत जास्त घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कडक उन्हामुळे तसेच प्रचंड आर्द्रतेमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून डिहायड्रेशन झालेले रुग्णही दवाखान्यामध्ये मोठ्या संख्येने येत आहेत, अशी माहिती कांदिवलीतील फॅमिली फिजिशियन डॉ. संजीव कुदळे यांनी दिली. तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला आहे.

राज्यातील दोन हजार गावे, वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा

उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत असताना पाण्याची मागणीही वाढत आहे. राज्यातील दोन हजारे गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तिथे टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात असून या टँकर्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील धरणांमध्ये फक्त 31.97 टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास धरणांतील पाणीसाठी 26.57 टक्क्यांवर आला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीस्थिती समाधानकारक असली तरी सुमारे 900 गावे आणि 2300 पेक्षा जास्त वाड्यावस्त्यांमध्ये 1140 टँकर्स पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

टँकर्सची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यामध्ये सातारा जिह्यात टँकर्सची मागणी सर्वाधिक आहे. तिथे रोज 31 टँकर्स पुरवावे लागत आहेत. त्याखालोखाल जालनातील पाणीस्थिती नाजूक आहे. ग्रामीण भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने विहिरी सुकू लागल्या आहेत. 80 टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेलमधील पाणीपातळीही खोल गेली आहे.