
बिहार विधानसभा निवडणुकीत 243 जागा लढवण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल व अन्य पक्षांच्या महागठबंधनने घेतला आहे. काँग्रेस आणि राजदसह बिहारमधील छोटे पक्ष आणि डाव्या पक्षांचा समावेश असलेले हे महागठबंधन सध्या बिहारमध्ये विरोधी पक्षात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महागठबंधनची तिसरी महत्वाची बैठक पार पडली. त्यात आगामी निवडणूक एकत्रितपणे लढवून सर्वच्या सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती राजद नेते व राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी दिली. महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र अद्याप ठरलेला नाही.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद पक्ष 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राजदला काँग्रेस (19 ) आणि सीपीआय (12) या पक्षांचा पाठिंबा होता. परंतु त्यानंतरही हे महागठबंधन बहुमतापासून थोडे दूर राहिले होते. ती संधी साधता भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांच्या जनता दलाशी युती करून सत्ता मिळवली होती. यावेळी बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपबद्दल नाराजी दिसून येत आहे.