
उल्लू अॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ रिऑलिटी शोमुळे वादात अडकलेला अभिनेता एजाज खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याचे अमिष दाखवून एजाज खानने बलात्कार केल्याचा आरोप 30 वर्षीय अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईतील चारकोप पोलीस स्थानकामध्ये एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अभिनेत्रीला एजाज खानने ‘हाऊस अरेस्ट’ शोसाठी आमंत्रित केले होते. शोचे शूटिंग सुरू असताना एजाज खानने अभिनेत्रीला प्रपोज केले आणि त्यानंतर धर्म बदलून लग्न करण्याचे आश्वासनही दिले. यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. यानंतर रविवारी सायंकाळी पीडित अभिनेत्रीने चारकोप पोलीस स्थानक गाठत एजाज खान याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एजाज खानविरुद्ध भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एजाजवर कलम 64, 64 (2एम), 69 आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एजाज खानचा रिऑलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’ अश्लील टिप्पणीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोच्या अनेक छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या शोच्या माध्यमातून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर एजाजविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांना या प्रकरणी समन्स बजावल्यानंतर हा शो काढून टाकण्यात आला.