
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळींची साक्षीदार असलेली, अनेक महान विभुतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि लाखो देशभक्तांसाठी प्रेरणास्थान असलेली दादर येथील सावरकर सदन ही ऐतिहासिक वास्तू लवकरच पाडली जाऊ शकते. या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्विकासाला सहमती दर्शविली असून काहींनी विकासकाला आपली घरे विकल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या ऐतिहासिक इमारतीच्या पुनर्विकासाला सावरकरप्रेमींनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर सावरकर सदन आहे. हे केवळ सावरकरांचे निवासस्थान नसून अनेक राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार आहे. आता ही इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने ती पाडून त्याजागी नव्या स्वरूपात बांधकाम करण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी मालमत्तेच्या पुनर्विकासाला सहमती दर्शविली आहे आणि काहींनी त्यांची घरे विकासकाला विकली आहेत. ही इमारत बाहेरून व्यवस्थित दिसत असली तरी आतून मोडकळीस आली आहे, अशी माहिती एकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडून नव्या इमारतीतील मझेलन फ्लोअरवर सावरकरांना समर्पित मोठय़ा संग्रहालयासाठी अधिक जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या मजल्याला ‘सावरकर सदन’ हे नाव कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
तत्काळ वारसास्थळाचा दर्जा द्या
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनुयायी आणि इमारतीचे माजी रहिवासी प्रा. पंकज फडणीस म्हणाले, भाजपला सावरकरांचा खरोखर सन्मान करायचा असेल तर सावरकर सदनला तत्काळ वारसास्थळाचा दर्जा द्यावा. सावरकर सदन हे 1938 साली शिवाजी पार्कमधील सुमारे 405 चौ.मी. भूखंडावर दोन मजली बंगला म्हणून उभारले गेले. अभिनव भारत या गुप्त संघटनेचे संस्थापक आणि हिंदू महासभेतील प्रमुख नेता म्हणून सावरकर या बंगल्यात वास्तव्यास होते. या ठिकाणी 1940 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सावरकरांशी भेट झाली होती.