
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंचावर हिंदुस्थानने पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तानच असल्याचे ठामपणे सांगितले. त्यानंतरही पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने सलग 12 व्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, पूँछ, राजौरी, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेजवळ लहान शस्त्रांंच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याने सातत्याने गोळीबार सुरूच ठेवला आहे. त्याला हिंदुस्थानी लष्कराचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत.
हिंदुस्थानच्या हक्काचे पाणी हे हिंदुस्थानसाठी वाहणार
हिंदुस्थानच्या हक्काचे पाणी हिंदुस्थानला मिळत नव्हते; परंतु आता आपल्या हक्काचे पाणी आपल्यासाठीच वाहणार, थांबणार आणि हिंदुस्थानच्या उपयोगी येणार, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सिंधु जल करार रद्द केल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर नद्यांचे पाणीही रोखले जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 2047 पर्यंत विकसित होणे हे बदलत्या हिंदुस्थानचे सर्वात मोठे स्वप्न आहे. आपल्याकडे सामर्थ्य, संसाधन आणि इच्छाशक्ती आहे. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका असे विवेकानंद यांनी म्हटले होते. आज तीच जिद्द इथे दिसते, असेही मोदी म्हणाले.
एलओसीवर पाकिस्तानी घुसखोराला अटक
जम्मू आणि कश्मीरच्या पूँछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ वकास या 26 वर्षीय पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असून गोळीबार करण्यात येत आहे.
पंजाबमधून मोठा शस्त्रसाठा जप्त
पंजाब पोलिसांनी एसबीएस नगर जिह्यात धाड टाकली. या कारवाईत दोन आरपीजी, पाच हँड ग्रेनेड, आयईडी हस्तगत करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून स्लीपर सेलद्वारे मोठा घातपात घडवण्याचा डाव होता.