
मुंबई मेट्रो लाईन 3 च्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यानंतर पुढील प्रवास कोणत्याही कटकटीविना व्हावा यासाठी बेस्टने 32 मार्ग हे मेट्रोबरोबर जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार या मार्गांची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे. यामुळे मेट्रो आणि बेस्टच्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
मुंबईची दुसरी महत्त्वाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट सध्या मोठय़ा आर्थिक संकटात आहे. बेस्टमधून दररोज सुमारे 35 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो 3 मार्ग हा कुलाबा ते सीप्झ असा होणार आहे. या मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे परिसर येणार असल्यामुळे या मार्गावरून मेट्रोने उतरल्यानंतर पुढील प्रवास कोणत्याही कटकटीविना व्हावा यासाठी हे मार्ग बेस्टने जोडले जाणार आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. बेस्टकडे सध्या सुमारे 2 हजार 800 बसचा ताफा असून यातून दररोज सुमारे 35 लाख प्रवासी प्रवास करतात. या बैठकीत बेस्टने मुंबई मेट्रो लाईन 3 (कुलाबा-बीकेसी-आरे) ही ‘अॅक्वा लाईन’ पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि बेस्ट प्रवाशांच्या सोयीसाठी बस मार्गांची पुनर्रचना सादर केली.
नव्या रचनेनुसार, 13 मार्गांवरील फेरफार (464 फेऱया वाढवणे), 6 मार्गांचे वळवणे (264 फेऱया), 3 मार्गांचे विस्तार (78 फेऱया) आणि 10 मार्गांचे कपात (435 फेऱया) यांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 241 बस फेऱयांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
भूमिगत मार्गाचा दुसरा टप्पा (बीकेसी ते वरळी नाका) लवकरच सुरू होणार असून शेवटचा टप्पा (कफ परेड) पुढील काही महिन्यांत अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याचे (आरे-जेव्हीएलआर ते बीकेसी) उद्घाटन ऑक्टोबर 2024 मध्ये झाले होते.
मार्ग पुनर्रचनेव्यतिरिक्त बेस्टने दुसऱया टप्प्यासाठी 17 मार्गांवर 29 अतिरिक्त बस आणि तिसऱया टप्प्यासाठी 30 मार्गांवर 50 बस चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या या मार्गांवर अनुक्रमे 45 व 84 बस चालवल्या जात आहेत.
जास्त गर्दीच्या वेळांमध्ये उच्च मागणी असलेल्या मार्गांवर अधिक बस चालवण्यात येणार आहेत. नवीन सेवा ‘रिंग-रूट’ पद्धतीने सुरू करण्यात येणार असून त्या मेट्रो स्थानकांना उपनगरी रेल्वे स्थानके आणि व्यापारी भागांशी जोडले जातील.



























































