
सिद्धेश घोरपडेने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या व्रॅचरेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देत राजधानी नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्पोर्ट्स काॅम्प्लेक्समध्ये मंगळवारचा दिवस गाजविला. याचबरोबर मुलींच्या गटात मराठमोळय़ा आकांक्षा म्हेत्रे हिने मेडल टाईम ट्रायल प्रकारात रौप्य, तर व्रॅचरेस प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत दुहेरी धमाका केला.
मुलांच्या 10 किलो मीटर व्रॅचरेसमध्ये अतिशय चुरशीचा खेळ बघायला मिळाला. महराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेला महावीर सारन व सीताराम बेनिवले या राजस्थानी सायकलपटूंकडून कडवी लढत मिळाली, मात्र अखेरच्या काही मीटरमध्ये सिद्धेशने जिवाचे रान करीत 13 मिनिटे 26.584 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महावीर सारनला 13 मिनिटे 26.601 सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनिशिंग लाईनला सिद्धेशने बाजी मारली. सीतारामने 13 मिनिटे 27.933 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
आकांक्षा म्हेत्रेला रौप्य अन् कांस्य
मुलींच्या 7.5 किलो मीटरच्या व्रॅचरेस प्रकारात आकांक्षा म्हेत्रेला आपला राज्य सहकारी सिद्धेश घोरपडेच्या सोनेरी यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राच्या या सायकलपटूला (11 मिनिटे 51.649 से.) एका सेकंदाच्या फरकामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यावरून ही शर्यत किती अटीतटीची झाली असेल याचा सहज अंदाज येतो.