Operation Sindoor – दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राइक

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने याबाबत X वर पोस्ट करत माहिती दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. जिथून हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात होती आणि आदेश दिले जात होते.

संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. आमच्या कृती प्रक्षोभक नसून केंद्रित आहेत. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केलेले नाही. हिंदुस्थानने लक्ष्य निवडण्याच्या पद्धतीत खूप संयम दाखवला आहे. पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये 25 हिंदुस्थानी आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.”