
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिह्यात विधान भवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’अंतर्गत मॉकड्रिल यशस्वी पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विधान भवनाच्या प्रांगणात दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलपुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, मॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला होता. सुरुवातीला भोंगा वाजविण्यात आल्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला, त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. याअनुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. मॉकड्रिल प्रक्रिया 25 ते 60 मिनिटांत पूर्ण केली.





























































