
हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर राबवले. याअंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. नुकताच रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट झालेला आहे. हिंदुस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानचे 4 जवान जखमी झाल्याचे वृत्त पाकिस्तानमधील मीडियातून देण्यात येत आहे. लाहोर, रावळपिंडी, गुजरनवाला, चकवाल, अटक, भवालपूर, मिआनवाली, छोर, कराची येथे मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्यामुळे सध्याच्या घडीला अंदाधुंद वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी पत्रकार परिषदेत, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माहिती केली. त्यांनी सांगितले की, 7-8 मे मध्यरात्री हिंदुस्थानने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. यामध्ये सिंधमधील मियानो येथे ड्रोन अपघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला, तर लाहोरजवळ जखमी सैनिकांना लक्ष्य करण्यात आले. लष्कराच्या मीडिया विंगच्या प्रमुखांनी हे हल्ले गंभीर वाढ असल्याचे सांगितले, त्यांनी हिंदुस्थानला वारंवार चिथावणी दिल्याचा आरोप केला. यापूर्वी, पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (PAA) देशभरातील अनेक प्रमुख विमानतळांवर उड्डाण ऑपरेशन स्थगित केले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
सध्याच्या घडीला कराची, लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद आणि सियालकोट येथील विमानतळ अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नोटीस टू एअरमन (NOTAM) द्वारे सर्व विमान कंपन्यांना बंदची सूचना देऊन ऑपरेशन्स स्थगित करण्याची पुष्टी करण्यात आली. लाहोरला जाणारी सर्व येणारी उड्डाणे कराची विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत. यामध्ये जेद्दाह, दुबई, मस्कत, शारजाह आणि मदीना येथून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. लाहोर वॉल्टन रोड आणि आसपासच्या परिसरात एकापाठोपाठ एक तीन स्फोटांचे आवाज ऐकू आल्यामुळे, गुरुवारी सकाळी रहिवासी भीतीने घराबाहेर पडले. लाहोर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्फोट काही क्षणातच झाले. स्फोटांचा आवाज इतका मोठा होता की अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला, ज्यामुळे शेकडो लोक गोंधळात आणि सावधगिरीने रस्त्यावर जमले.

























































