Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त! स्टेडियम पाहून पाकिस्तानी म्हणाले- बिजली गिरी…

हिंदुस्थानच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानचे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झाले आहे. आजच संध्याकाळी या मैदानावर पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थान करत असलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. एकामागून एक होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे संपूर्ण पाकिस्तान भयभीत झालेला दिसत आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडीसारख्या प्रमुख शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याच ठिकाणी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता.

Big Breaking- रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट

हा पीएसएल सामना पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात होणार होता. कराचीचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आहे आणि पेशावरचा कर्णधार बाबर आझम आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, रावळपिंडीमध्ये होणारे पीएसएलचे उर्वरित सर्व सामने (आजच्या सामन्यासह) कराचीला हलवण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी माणूस म्हणत आहे की, ‘येथे ड्रोन हल्ला झाला आहे, पण पोलिस म्हणत आहेत की वीज पडली आहे.’

22 एप्रिलला कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमधील कटुता आणखी वाढली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने अनेक कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार निलंबित करणे आणि पाकिस्तानमध्ये पीएसएलच्या प्रसारणावर बंदी घालणे यांचा समावेश होता. पण पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 7 एप्रिलच्या रात्री हिंदुस्थानने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

हिंदुस्थानने ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे घडले. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 7 आणि 8 मे च्या मध्यरात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी प्रतिष्ठानांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हाणून पाडले.