
सोमवारी 5 मे रोजी लग्न झालेल्या एका जवानाला बॉर्डरवरून फोन आल्यानंतर अंगाला लागलेल्या हळदीसह पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडण्यासाठी सीमेवर जावं लागण्याची वेळ आली आहे. यावेळी नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी आपले कुंकू पाठवत असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली.
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील लष्करी जवान मनोज पाटील यांचे नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी लग्न ठरले होते. या लग्नासाठी ते सुट्टी घेऊन गावी आले होते. त्यांचे 5 मे रोजी लग्न झाले. पाचोरा येथे हा लग्नसोहळा पार पडला. मात्र हा लग्न समारंभ आटोपत नाही तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने मंगळवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकवर हवाई हल्ले केले. यामुळे दोन्ही देशांत युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाककडून होणार्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे लष्कराने आपल्या सर्वच जवानांच्या सुट्या तात्काळ रद्द केल्या आहेत. त्यानुसार लग्नासाठी गावी आलेल्या मनोज पाटील यांनाही तत्काळ कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.
मनोज पाटील हे 8 तारखेला पाक सीमेच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या नववधूला सुखरूप परत येण्याचा विश्वास दिला. तथापि, कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असताना देशसेवेसाठी कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना अभिमान आहे. आपल्यासाठी देशापेक्षा दुसरे काहीही मोठे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मनोज यांच्या पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या मनोधैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी नववधूची प्रतिक्रिया विचारली असता तिने ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझे कुंकू पाठवत असल्याची भावूक प्रतिक्रिया दिली.