
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या फटकेबाजीला साप्ताहिक विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा आपला देश दहशतवाद्यांविरुद्ध लढा देतोय, तेव्हा राष्ट्रहित हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगत आम्ही आयपीएलला स्थगिती देत असल्याची भावना बीसीसीआयने व्यक्त केली.
काल जम्मू आणि पठाणकोट येथे हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर बीसीसीआयने धर्मशाळा येथे दिल्ली आणि पंजाब यांच्यात सुरू असलेला सामना 10.1 षटकांच्या खेळानंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तो सामनाही रद्द केला. तेव्हाच आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग पसरले होते आणि आज बीसीसीआयने देशात असलेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत सात दिवसांसाठी आयपीएलला विश्रांती देण्याचा देशहिताचा निर्णय घेतला. त्यामुळे आयपीएलचा सुधारित कार्यक्रम आणि आयोजनाबाबत पुढील माहिती योग्य वेळी दिली जाईल तसेच आयपीएलशी संबंधित अधिकारी आणि हितधारकांशी वर्तमान परिस्थितीबाबत चर्चा केली जाईल, असेही बीसीसीआयने कळवले आहे.
आयपीएलची विश्रांती वाढणार
येत्या 25 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना कोलकाता येथे खेळवला जाणार होता. अद्याप 16 सामने शिल्लक आहेत आणि ते योग्यवेळी करण्याचा आयपीएलचा प्रयत्न असेल, पण देशावर ओढावलेल्या संकटामुळे आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. आम्ही पेंद्र सरकार, सेनादल आणि नागरिकांच्या सोबत आहोत, अशीही भावना बीसीसीआयने व्यक्त केली आहे. तसेच आयपीएलला आठवडय़ाची विश्रांती दिल्यामुळे सर्व परदेशी क्रिकेटपटू तत्काळ आपापल्या मायदेशी परतण्याची व्यवस्था बीसीसीआयने केली आहे. त्यामुळे पुढचा कार्यक्रम बीसीसीआयने जाहीर केला तरी त्यापैकी किती खेळाडू पुन्हा हिंदुस्थानात परततील याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे आयपीएलची आठवडय़ाची विश्रांती आणखी काही दिवस वाढू शकते.
देशच सर्वप्रथम
आयपीएलला आठवडय़ाची विश्रांती दिल्यानंतर हिंदुस्थानातील क्रिकेटपटूंसह सर्व आयपीएल फ्रेंचायझीजनीही आमच्यासाठी क्रिकेट नव्हे देश सर्वप्रथम असल्याचीही भावना सोशल मीडियावर व्यक्त केलीय. लखनौ संघाने आपल्या पेजवर लिहिलेय, देश सर्वप्रथम तर कोलकाता संघाने आमची ढाल हिंदुस्थानी सेना. देश सर्वप्रथम असा संदेश सर्वांना दिलाय.
आशिया स्पर्धा रद्द करण्याचाही पर्याय
आयपीएलची विश्रांती वाढली तर आगामी आशिया चषकाच्या कार्यक्रमादरम्यान उर्वरित 16 सामने खेळविण्याचा पर्यायही बीसीसीआयसमोर आहे. येत्या 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानात खेळविली जाणार आहे. आयपीएलचे आयोजन लांबणीवर पडले तर आशिया चषक पुढे ढकलून उर्वरित 16 सामने खेळविले जाऊ शकतात. मात्र आयपीएलची विश्रांती सात दिवसांपेक्षा अधिक वाढली तर हिंदुस्थानात मान्सूनमुळे सामने खेळवणे शक्य होणार नसल्याचीही बीसीसीआयला कल्पना आहे.
स्थलांतरित करण्याचाही पर्याय उपलब्ध
आजवर आयपीएलचे आयोजन अनेकदा परदेशातही करण्यात आले आहे. मग त्या निवडणुका असो किंवा कोरोना काळ. यंदाही हिंदुस्थानातील तणावाचे वातावरण निवळले नाहीतर बीसीसीआय उर्वरित सामने यूएईच नव्हे तर दक्षिण आफ्रिका येथेही खेळवू शकते, मात्र बीसीसीआय सध्या आयपीएल स्थलांतरित करण्याचा विचार करत नाहीय.
- आयपीएल राऊंडअप
आधी देश, नंतर नवा कार्यक्रम – शुक्ला
सीमेवर वाढलेल्या तणावानंतर आयपीएलच्या आतषबाजीला एका आठवडयाची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलचा नवा कार्यक्रम नंतर जाहीर करू. आधी आम्ही आमच्या हिंदुस्थानी सैन्याबरोबर उभे आहोत. आमची प्राथमिकता देशाची सुरक्षितता आणि एकता असल्याचे मत बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले.
खेळाडूंनी वंदे भारतने दिल्ली गाठली
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना अर्ध्यावरच रद्द केल्यानंतर शुक्रवारी दोन्ही संघातील खेळाडू आणि कर्मचार्यांना 40-50 कारमधून होशियारपूर मार्गे जालंधर रेल्वे स्थानकापर्यंत कडेकोट बंदोबस्तात पोहोचविण्यात आले. त्यानंतर वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेतून खेळाडू आणि कर्मचार्यांनी नवी दिल्ली गाठली. तसेच परदेशी खेळाडूंना आपापल्या मायदेशी रवाना करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एपूण 64 विदेशी खेळाडू खेळत होते.
बीसीसीआय मार्ग काढील – गांगुली
आयपीएलला ब्रेक लागला असला तरी बीसीसीआय उर्वरित आयपीएल आयोजनासाठी मार्ग काढील आणि पेंद्र सरकारच्या दिशा-निर्देशानुसार स्पर्धेचा यशस्वी समारोप करील. करोना काळातही बीसीसीआयने आयपीएलचे दुबईत आयोजन करून आयपीएलचे यशस्वी आयोजन केल्याची आठवण माजी कसोटीपटू सौरभ गांगुलीने ताजी केली.
तिकिटांची लवकरच माहिती
आयपीएलला सात दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे रद्द झालेल्या सामन्यांच्या तिकीटांचे पैसे परत कधी दिले जाणार याची माहिती लवकरच प्रेक्षकांना मिळेल. जर सामने सात दिवसानंतर खेळविले जाणार असतील तर हीच तिकीटे त्या-त्या सामन्यांना चालतील. मात्र मुंबई-पंजाब यांच्यातील स्थलांतरित सामना आणि दिल्ली-पंजाब यांच्यातील अर्धवट सामन्यांचे पैसे लवकरच क्रिकेटप्रेमींना परत दिले जाणार आहेत. मात्र याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने कळवले आहे.
जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी ठरली अफवा
अरुण जेटली स्टेडियम उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला मिळाल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ स्टेडियमवर जाऊन पाहणी केली. तपासानंतर ही बॉम्बने उडवण्याची धमकी निव्वळ अफवा असल्याने निष्पन्न झाले आहे. डीडीसीएच्या ई-मेलवर अरुण जेटली स्टेडियम उडवून देण्याची धमकी आली असल्याची माहिती डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी दिली. त्यामुळे तत्काळ दिल्ली पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण स्टेडियमची झडती घेतली, मात्र काहीही सापडले नाही. तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र या धमकीनंतर स्टेडियमच्या आत आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.