
हिंदुस्थानचा संघ आगामी महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. आगामी काही दिवसात या दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विराट कोहली याने निवृत्ती घेण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली. विराटच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून बीसीसीआयनेही त्याला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. आता दिग्गज खेळाडू ब्रायन लारानेही बीसीसीआयची री ओढली असून विराटला तुझी कसोटी क्रिकेटला गरज असल्याचे म्हटले आहे.
ब्रायन लारा याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीसोबत एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. कसोटी क्रिकेटला विराट कोहलीची गरज आहे. त्याची समजूत काढली जाईल. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नाही. विराट आपल्या उर्वरित कसोटी कारकिर्दीत 60 हून अधिक सरासरीने धावा बनवू शकतो, असे या पोस्टमध्ये लाराने नमूद केले आहे.
ब्रायन लारा याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 52.88 च्या सरासरीने 11,953 धावा केलेल्या आहेत. या त्याच्या ऐतिहासिक नाबाद 400 धावांचा समावेश आहे. तर लाराने वन डे क्रिकेटमध्ये 40.48 च्या सरासरीने 10,405 धावा केलेल्या आहेत.
View this post on Instagram
विराट कोहली याने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. यात त्याने 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केलेल्या आहेत. यात त्याच्या 30 शतकांचा आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. लवकरच तो 10 हजार धावांचा टप्पाही पार करू शकतो. मात्र तत्पूर्वीच त्याने निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याने चाहत्यांना धक्का बसला.