
रविवारी हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी हिंदुस्थानी पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर सीमेवर घडलेल्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. अलिकडेच नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानने गोळीबार केला होता. ज्याच्या प्रत्युत्तरात हिंदुस्थानने केलेल्या गोळीबारात पाकचे 40 सैनिक ठार झाले, तर पाच हिंदुस्थानी जावं शहीद झाले, अशी माहिती सैन्यदलांच्या प्रमुखांनी दिली. ऑपरेशन सिंदूरमधील सर्व हिंदुस्थानी पायलट सुरक्षित असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. पाकिस्तानला इशारा देताना लष्कराने म्हटले आहे की, जर पाकिस्तानने अजूनही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, “काही एअरफील्डवर वारंवार हवेतून हल्ले झाले. ते सर्व परतवून लावण्यात आले. 7 ते 10 मे दरम्यान नियंत्रण रेषेवर तोफ आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात सुमारे 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.”
यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की, या कारवाईदरम्यान हिंदुस्थानने किती पाकिस्तानी विमाने पाडली. याचे उत्तर देताना एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, “पाकिस्तनाच्या विमानांना आपल्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यावेळी आम्ही काही विमाने पाडली आहेत. यात त्यांचं नुकसान झालं आहे.”