अखेर अडीच वर्षांनंतर गोखले पूल सुरू; पश्चिम उपनगरातील प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थ्यांना दिलासा

तब्बल अडीच वर्षांच्या कालावधीनंतर अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. हा पूल सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होणार असून पश्चिम उपनगरातील जुहू, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझमधील प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याने हा पूल 7 नोव्हेंबर 2022 ला वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आला होता. हा पूल सुरू झाल्याने एस. व्ही. रोडसह लिंक रोडवर होणाऱया वाहतूककाsंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. तसेच मेट्रोवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. अंधेरी पूर्व येथील तेली गल्ली उड्डाणपुलासह गोखले पुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून अंधेरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गापर्यंत जोडणी होणार आहे. बर्फीवाला उड्डाणपुलाद्वारे स्वामी विवेकानंद मार्ग चौकातील वाहतूक टाळून पश्चिम दिशेकडील जेव्हीपीडी, जुहू, वेसावेपर्यंत थेट वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.