कर्तव्यावर परतताना मेजरच्या गाडीला अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी 

दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात लष्करातील मेजरचा पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. राजस्थानच्या कोटावरून दिल्लीत परतत असताना हा अपघात झाला.

दिल्लीत दिलशाद गार्डन परिसरात राहणारे मेजर विक्रम गुप्ता हे सुट्टीवर घरी आले होते. काही दिवसांसाठी ते पत्नी वैशाली आणि मुलगी रिहानासह राजस्थानमधील नातेवाईकांकडे गेले होते. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना लवकरात लवकर कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश लष्कराकडून आले होते. त्यानुसार ते पत्नी आणि मुलीसह तातडीने परतत होते. मात्र, अतिशय वेगाने गाडी चालवल्यामुळे दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा टायर फाटला आणि गुप्ता यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा दुर्दैवी अपघात झाला. पत्नीचा जागीच म्त्यू झाला तर मुलीवर अलवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.