
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता शांत झाला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीची तयारी दाखवली. यामुळे सोमवारी आठवडय़ाच्या सुरुवातीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 2.80 टक्क्यांनी म्हणजे सुमारे 3000 अंकांनी वाढून 82,429 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीदेखील सुमारे 916 अंकांनी वर जाऊन 24,924 च्या पातळीवर पोहोचला.
सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये तेजी आहे. अदानी पोर्टस्, बजाज फायनान्स, ऑक्सिस बँक यासह 17 शेअर्स 4.5 टक्क्यांपर्यंत वाढले. सन फार्माच्या शेअर्समध्ये 5.5 टक्के घसरण झाली. निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये वाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये रिअल्टी 4.71टक्के, धातू 3.40टक्के, सार्वजनिक क्षेत्रातील बँका 2.88टक्के, खासगी बँका 2.84 टक्के, आयटी 2.39 टक्के आणि ऑटो 2.33 टक्क्यांनी वधारले आहेत.
मिड-स्मॉल कॅप इंडेक्स जवळपास 4 टक्के वाढला. एनएसई आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर व्यवहार होणारा निफ्टी सुमारे 750 अंकांनी (3.10टक्के) वाढून 24,800 वर पोहोचला. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1,678 अंकांनी (3.59टक्के) वाढून 48,420 वर व्यवहार करत होता. मिड-कॅप निर्देशांक 1,175 अंकांनी (2.79टक्के) वाढला आहे आणि 43,287 वर व्यवहार करत आहे.
येस बँक जोरात
खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. जपानी बँक एसएसबीसी आता येस बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. यामुळे आज बाजार उघडताच बँकेचा शेअर 8.7 टक्के वाढून 21.74 रुपयांवर पोहोचला. याअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील त्यांच्या 24 टक्के हिस्स्यांपैकी 13.19 टक्के हिस्सा 8,889 कोटींना विकेल.
पाकिस्तानात एक तासासाठी ट्रेडिंग थांबवले. 9400 अंकांची वाढ
हिंदुस्थानसोबतच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर सोमवारी पाकिस्तान शेअर बाजाराचा केएसई-100 निर्देशांक 9 टक्क्यांनी वाढला. बाजारात झालेल्या या तेजीनंतर, एक तासासाठी व्यवहार थांबवावे लागले. त्यानंतर व्यवहार पुन्हा सुरू झाले. केएसई-100 निर्देशांक 9,400 अंकांनी किंवा 8.80टक्के वाढीसह 1,16,570 पातळीवर व्यवहार करत आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंद्स्थानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर 7 आणि 8 मे रोजी दोन दिवसांत तो 10,000 पेक्षा जास्त अंकांनी (सुमारे 11 टक्के) घसरला होता.
युद्धविरामासह आयएमएफकडून मिळालेली 20 हजार कोटींची मदत या कारणांमुळे पाकिस्तानचा शेअर बाजारात जोरदार वाढ झाली आहे. पाकिस्तानातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत आहे. त्याचा परिणाम मार्केटवर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकचा मोठा फटका पाकिस्तानी शेअर मार्केटला बसला होता. मात्र आता तिथले मार्केट सावरत आहे, असे दिसतंय.