ताडोबामध्ये व्याघ्रगणना सुरू, 81 मचाणी, 162 पर्यटक सहभागी

बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱया व्याघ्रगणना कार्यक्रमात 81 मचाणीवर 162 पर्यटक सहभागी झाले असून कोर झोनमध्ये वन अधिकारीच गणना करणार आहेत.

ताडोबा व्यवस्थापनाकडून गेल्या 15 दिवसांपासून या उपक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी बफर क्षेत्रातील 81 मचाणी सज्ज करण्यात आल्या असून 6 वन परिक्षेत्रात ही गणना होत आहे. यामध्ये मोहरली, मूल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव आणि खडसंगी वन परिक्षेत्रांचा समावेश आहे. एका मचाणीवर दोन पर्यटक आणि एक गाईड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणीचा अनुभव घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार 162 पर्यटकांची निवड करण्यात आली. पर्यटकांना सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वन विभागाच्या मदतीने 16 प्रवेशद्वारांवरून मचाणीवर पोचवले आहे.

183 अधिकारी-कर्मचारी सहभागी

यापूर्वी ताडेबात बफर आणि कोअर अशा दोन्ही क्षेत्रांत व्याघ्रगणना केली जायची. मात्र 2017 मध्ये वाघाच्या हल्ल्यात वनमजुरावर हल्ला झाल्यामुळे सामान्य नागरिकांना कोअर क्षेत्र बंद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या वर्षी कोअर क्षेत्रात 95 मचाणी उभारण्यात आल्या असून यावरून वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी निरीक्षण करणार आहेत. यामध्ये 183 अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.