
दुचाकीवरून आलेल्या दोनजणांनी घरासमोर थांबलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे कृष्णाई कॉलनीमध्ये घडली. चिंचवड पोलिसांनी दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे. प्रथमदर्शनी आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्यापि समजू शकलेले नाही.
अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी तिच्या मामाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उदयभान बन्सी यादव (42, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिषेक रणविजय यादव (21, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मयत मुलगी ही आपल्या आई व भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे.
रविवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी घराबाहेर थांबली होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या उदयभान व अभिषेक यांनी तिच्यावर चाकूने सपासप वार केले. गळा, पाठ आणि हातावर वार केल्याने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. मुलीला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात दाखल करताच, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना गजाआड केले. प्रथमदर्शनी आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्यापि समजू शकलेले नाही. आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर खुनामागील कारणाचा उलगडा होईल, असे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.



























































