
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आरबीआयने एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, बँकेच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे आरबीआयने एसबीआयला दंड ठोठावल्याचे समोर आले आहे.
कर्ज आणि कर्जफेडीवरील वैधानिक निर्बंध, ग्राहक संरक्षण, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या दायित्वावर मर्यादा घालणे आणि बँकांकडून चालू खाते उघडण्याप्रकरणी शिस्त लावणे यांसारख्या अनेक सूचनांचे एसबीआयने पूर्णपणे पालन केले नाही. त्यामुळे आरबीआयने एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत एसबीआयने दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आरबीआयने एसबीआयला दंड ठोठावला.
जय स्मॉल फायनान्स बँकेला 1 कोटीचा दंड
जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
या दंडाचा ग्राहकांशी संबंधित व्यवहारांच्या वैधतेवर किंवा बँकांसोबतच्या त्यांच्या करारांच्या वैधतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.