
मुंबई महापालिकेने मलबार हिलवर तयार केलेला शांत, निसर्गरम्य पायी प्रवासाबरोबरच चौपाटीचा सुंदर नजारा दाखवणारा नेचर ट्रेल वॉक पर्यटकांसाठी, मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देणारा आहे. केवळ एका महिन्यात 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी याला भेट दिली असून त्यातून पालिकेला सुमारे 27 लाखांचा महसूल मिळाला आहे. तुम्हीही या आणि नेचर ट्रेल वॉकचा नक्की आनंद घ्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यटक आणि मुंबईकरांना केले आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी 2021 साली पर्यटनमंत्री असताना सिंगापूरच्या ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेच्या धर्तीवर मुंबईत पहिल्यांदाच कमला नेहरू उद्यानाजवळ मलबार हिल येथे नेचर ट्रेल वॉक (निसर्ग उन्नत मार्ग) उभारण्याची संकल्पना मांडली आणि त्यासाठी महापालिकेची मंजुरी मिळवली. मात्र, मिंधे सरकारमुळे या प्रकल्पाचे काम रखडले. शेवटी या नेचर ट्रेलचे काम पूर्ण करून मार्च 2025 मध्ये महापालिकेने याचे लोकार्पण केले. निसर्गाचा समतोल राखून बनवलेली ही पाऊलवाट पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आदर्श ठरणार असून देशी-परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनणार आहे. झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवलेली नाही.
12 एकरमधील जंगल पाहता येणार
मलबार हिल परिसरातील 12 एकर जंगलाचा परिसर यामुळे पर्यटकांना पाहता येणार आहे. 400 मीटर लांब आणि 2.4 मीटर रुंदीच्या रस्त्यात स्टील आणि लाकडी कोटिंग असणारा मार्ग बनवण्यात आला आहे. शिवाय मार्गाच्या दुतर्फा असणारे हँड रील लाकडी स्वरूपात बनवण्यात आले आहेत.
अशी करा ऑनलाइन तिकीट नोंदणी
निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाइन तिकीट काढता येते. हिंदुस्थानी नागरिकांसाठी 25 रुपये तसेच परदेशी नागरिकांना 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये यासाठी एकावेळी 200 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येतो. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत तसेच ऑनलाइन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश देण्यात येणार आहे.
पक्षी-वनस्पती निरीक्षणाची संधी
मलबार हिलवरील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱया 100 हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणाऱया प्राण्यांचे निरीक्षण करण्याची संधी मुंबईकर, पर्यटकांना मिळत आहे. हा मार्ग जमिनीपासून उंचीवर असल्यामुळे या ठिकाणच्या पक्षी-प्राण्यांना पर्यटकांचा उपद्रव होणार नाही. शिवाय उंचावरून स्वप्ननगरी मुंबईचे दर्शनही घेता येणार असून पह्टो, सेल्फीही काढता येणार आहे.