
टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा व विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटपटू आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळणार आहेत. मात्र, 2027 मध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपपर्यंत हे दोन्ही महान खेळाडू टीम इंडियात नसतील, असे खळबळजनक विधान महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केले आहे.
हिंदुस्थानने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी कोणीही विचार केला नव्हता की, एका वर्षाच्या आत विराट कोहली आणि रोहित शर्मादेखील कसोटी क्रिकेटला रामराम म्हणतील. मात्र, या दोघांनी अवघ्या सहा दिवसांतच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत क्रिकेटविश्वाला अचंबित केलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला.
त्यानंतर 12 मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, आता केवळ वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय असलेली रोहित-विराट ही स्टार जोडी आगामी वन डे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचा भाग असेल असे मला वाटत नाही, असे धडकी भरविणारे विधान सुनील गावसकर यांनी केले आहे. त्यांचे हे विधान नक्कीच हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना न आवडणारे असे आहे.
कामगिरीतील सातत्यावर भविष्य अवलंबून
आगामी वन डे वर्ल्ड कप 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. सुनील गावसकर एका चॅट शो दरम्यान म्हणाले, ‘खरं सांगायचं तर मला वाटत नाही की, रोहित शर्मा व विराट कोहली आगामी वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळू शकतील. पुढच्या एक-दीड वर्षात दोन्ही खेळाडू चांगले खेळले तर त्यांना कोणीच रोखू शकणार नाही. मात्र, या जोडीच्या कामगिरीतील सातत्यावर ते पुढील वर्ल्ड कप खेळणार की नाहीत हे अवलंबून असेल, असेही गावसकर म्हणाले.



























































