ट्रम्प यांना जागा द्याल तर ते आणखी पसरत जातील; आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ अजय सहानी यांनी मांडले परखड मत

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मी घेतलेल्या व्यापारधोरणाच्या भूमिकेमुळे शस्त्रसंधी झाली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कश्मीरप्रश्नीही मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी त्यांनी दाखवली. यावरून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ आणि अजय सहानी यांनी परखड मत व्यक्त केले आहे. ट्रम्प यांना खोटे ठरवायला हवे. तुम्ही ट्रम्प यांच्यासमोर उभे राहिले नाहीत तर ट्रम्प हे आपली जागा तयार करतील आणि तुम्ही त्यांना जागा दिलीत तर ते त्यांचा आणखी विस्तार करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

कश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्दय़ावर बोलताना अजय सहानी म्हणाले. कश्मीरमधील अंतर्गत परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली होती, परंतु या एका घटनेवरून आपण कश्मीरमधील अंतर्गत सुरक्षेचे मूल्यांकन करू शकत नाही. कश्मीरमध्ये गेल्या 16 वर्षांपासून संघर्ष तीव्र होत गेला. हे आज लोक विसरले आहेत. 2001 मध्ये एका वर्षात 4 हजार 11 लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी 127 जणांना आपला जीव गमवावा लागला. मे महिन्यात 50 जणांचा मृत्यू झाला. यात सुरक्षा कर्मचारी, दहशतवादी आणि नागरिकांचाही समावेश असल्याकडे सहानी यांनी लक्ष वेधले.

अणुयुद्ध असे सुरू होत नसते

अणुयुद्ध असे सुरू होत नसते. अणुयुद्धाचा थोडासाही धोका असता तर दिल्लीतील प्रत्येक दूतावास रिकामा झाला असता. तुम्हाला ऑपरेशन पराक्रमचा तो काळ आठवत असेल. तेव्हा एक गोळीही चालली नव्हती, परंतु संपूर्ण दूतावास रिकामे झाले होते. अण्वस्त्राचा उच्चार पाकिस्तान करत आहे आणि ट्रम्प यांनीही केला आहे. अणुरोधक म्हणजेच परस्पर खात्रीशीर विनाश, हे एक साधन किंवा शस्त्र आहे, ज्याचा वापर केला जाऊ शकत नाही. कारण ते सर्व काही नष्ट करेल, कदाचित जगही, असेही सहानी यांनी स्पष्ट केले.

…तर पाकिस्तानसोबत 50 वर्षे लढत राहावे लागेल

पाकिस्तानसाठी दीर्घकालीन म्हणजेच 20 वर्षांसाठीची रणनीती असली पाहिजे. अन्यथा आपल्याला पाकिस्तानसोबत 50 वर्षे असेच लढत राहावे लागेल, असेही अजय सहानी म्हणाले. शिमला करारानंतर जो काही वाद निर्माण होईल तो द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवला जाईल, असे आपण म्हणालो होतो. प्रत्यक्षात अमेरिका या वादात पडली आणि बऱयाच काळापासून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे, या सांगण्यासारख्या गोष्टी नसतात असे सांगतानाच यावर उघड प्रतिक्रियेची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.