
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप नेते मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज कठोर शब्दांत ताशेरे ओढले. वेळ काय आहे, तुम्ही बोलताय काय, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवला. याप्रकरणी 16 मे रोजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीशांनी शहा यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि तुम्ही काय बोलताय? अशा संवेदनशील परिस्थितीत संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा विधानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.
उच्च न्यायालयात काय झाले?
महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी इंदूरच्या मानपूर पोलीस ठाण्यात विजय शाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत असल्याचे सांगितले. यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि हा हत्येचा तपास नाही, तर आक्षेपार्ह भाषणाशी संबंधित खटला आहे. अशा परिस्थितीत दीर्घ तपासाची आवश्यकता नाही, असे न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांनी सुनावले.
सरन्यायाधीश भडकले
विजय शाह यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी याचिका न्यायालयासमोर मांडल्यानंतर सरन्यायाधीश बी.आर. गवई संतापाच्या स्वरात म्हणाले, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने काही मर्यादा पाळणे अपेक्षित असते. मंत्र्याने उच्चारलेले प्रत्येक वाक्य जबाबदारीपूर्वकच असले पाहिजे. तुम्ही जबाबदारीने वागले पाहिजे. तुम्ही केवळ मंत्री आहात म्हणून… अन्यथा… अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी मंत्र्यांना सुनावले.
उच्च न्यायालयात जाऊन माफी मागा
सुनावणीदरम्यान मखीजा म्हणाले, शाह यांनी यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. यावर न्यायमूर्ती गवई म्हणाले, जा आणि उच्च न्यायालयात माफी मागा. वकिलांनी शाह यांचे प्रकरण विचारात घ्यावे असा आग्रह धरताच, सरन्यायाधीशांनी हे प्रकरण उद्या ऐकले जाईल असे सांगितले.