
लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. दिंडोशी न्यायालयाने एजाज खानचा अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एजाज खानची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती दत्ता ढोबळे म्हणाले.
एका रिअॅलिटी शो चा होस्ट आणि सेलिब्रेटी असल्याचा फायदा घेत एजाज खानने पीडित अभिनेत्रीला विश्वास घेतले. यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आणि आर्थिक आणि व्यावसायिक मदतीचे आश्वासन देऊन एजाज खानने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. अभिनेत्रीच्या फिर्यादीनंतर एजाजविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत बलात्कार आणि फसवणूक करून संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोघांमध्ये सहमतीने शरीरसंबंध झाल्याचा दावा एजाज खानच्या वकिलांनी केला आहे. वकिलांनी न्यायालयाला काही व्हॉट्सअॅप चॅट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्जही दाखवल्या, ज्यात पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे.
मोबाईल फोन जप्त करण्यासाठी, चॅट्स तपासण्यासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी एजाजची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, एजाजचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असा दावाही सरकारी वकिलांनी केला. एफआयआरमध्ये तारीख, ठिकाण आणि घटना स्पष्टपणे नमूद केल्या आहेत आणि हा केवळ संमतीने झालेल्या संबंधाचा खटला असल्याचे दिसत नाही. त्यामुळे एजाज खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.