
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवनेरी आणि शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवाशांना समान सुविधा आणि समान किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन वेगवेगळे तिकीट दर आकारले जात असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. समान सुविधा देणारे केवळ दोन वेगवेगळे ब्रँड तयार करून समान किलोमीटरसाठी शिवाईच्या प्रवाशांकडून अधिकचे पैसे उकळले जात आहेत. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या सुमारे 15 हजार बसचा ताफा आहे. या ताफ्यात नॉन-एसीपासून ते प्रीमियम वातानुकूलित ई-बसचा समावेश आहे. ई-शिवनेरी प्रामुख्याने मुंबई-पुणे मार्गावर धावते तर ई-शिवाई या बस ठाणे-अलिबाग, बीड-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर धावतात. महामंडळ ग्रीनसेल बनावटीच्या काही ई-शिवाई आंतरशहरी बसही पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथून चालवते. सुरक्षितता व सोयीसुविधांच्या दृष्टीने या बस ओलेक्ट्रा सी-टू यांच्यापेक्षा वेगळ्या नाहीत.
सारख्या सुविधा असूनही वेगवेगळे दर का?
शिवनेरी आणि शिवाईत एकसारख्याच सुविधा आहेत. मग दोन्ही बससाठी वेगवेगळे दर का आकारले जात आहेत. बसचा रंग बदलून किंवा सीट कव्हर बदलून एसटीने फक्त नवीन ब्रँड तयार केला आहे.
तिकीट दर रचना गुंतागुंतीची
एसटीकडे सध्या 13 प्रकारच्या बससेवा आहेत आणि तिकीट दर संरचना खूप गुंतागुंतीची आहे. ही गुंतागुंत कमी केली पाहिजे. तिकीट दर रचना फक्त चार वर्गांमध्ये केली पाहिजे. वातानुकूलित, नॉन-एसी, प्रीमियम आणि सामान्य. यामुळे तिकीट प्रणाली सुलभ होईल आणि प्रवाशांसाठीही सोपी ठरेल. सर्व दर 5 रुपयांच्या पटीत असायला हवेत त्यामुळे सुट्टय़ा पैशांचा त्रासही टळणार आहे, असे वाहतूकतज्ञ ए. व्ही. शेणॉय यांचे म्हणणे आहे.
अशी आहे तिकिटात तफावत
महामंडळ ‘ई-शिवनेरी’ (निळ्या रंगाची) बससाठी दर 6 किमीला 21.25 रुपये आणि ‘ई-शिवाई’ (पांढऱ्या-हिरव्या रंगाची) बससाठी 15.15 रुपये आकारते. दोन्ही बसेस ओलेक्ट्रा सी-टू प्लॅटफॉर्मवर आधारित असून त्या जीडीसीसी (जीसीसी) मॉडेलवर वेगवेगळ्या शहरी मार्गांवर धावतात.
काय आहेत सुविधा
दोन्ही 12 मीटर लांब वातानुकूलित बसेस असून, पुश-बॅक सीट्स, चार्ंजग पॉइंट्स आणि वाचन दिवे अशा सुविधा आहेत.