माहुलच्या घरांसाठी उद्या सोडत, पालिकेकडे आतापर्यंत केवळ 248 कर्मचाऱ्यांचे अर्ज

माहुलमधील मुंबई महापालिकेच्या 9 हजार 98 घरांसाठी मंगळवार, 20 मे रोजी अखेर दोन महिन्यांनंतर सोडत निघणार आहे. दोनदा मुदतवाढ तसेच निकष वेळोवेळी शिथिल करूनही गेल्या दोन महिन्यांत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत केवळ 248 अर्ज आले आहेत.

मुंबईतील पालिका कर्मचाऱ्यांसाठी विक्री करण्यात येणाऱ्या घरांची मुदत गुरुवार, 15 मे रोजी संपली. त्यामुळे आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या विशेष सोडतीला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार की पुन्हा निकषांत बदल केले जाणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र मुंबई महापालिकेने मुदतवाढ न देता 20 मे रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वस्त घरांकडे कर्मचाऱ्यांची पाठ

माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारांवर घरे रिक्त आहेत. त्यापैकी 9 हजार 98 घरे ही घरे पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत मालकी तत्त्वावर विक्री केली जाणार होती. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 15 मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत फक्त 231 अर्ज आले. अल्प प्रतिसादामुळे 15 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली तसेच निकषही शिथिल करण्यात आले.

उर्वरित 8 हजार 850 घरांचा पेच

मुंबई महापालिकेने 9 हजार 98 घरांसाठी अर्ज मागवले तरी केवळ 248 अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी करून सर्व अर्जदारांना घरे जरी देण्यात आली तरी 8 हजार 850 घरांचा पेच कायम आहे. या घरांसाठी पुन्हा सोडत काढली जाणार आहे की ही घरे सर्वसामान्यांसाठीही खुली केली जाणार आहेत, याबाबत पालिका मंगळवारी किंवा त्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.