
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या 6 ऑगस्टपर्यंत टेक-ऑफ आणि लॅण्डिगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कालावधीत या विमानतळाचा वापर करण्यात येऊ नये, अशी नोटीस हवाई प्राधिकरणाने वैमानिकांना आणि विमान कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे या विमानतळाचे जूनमध्ये होणारे उद्घाटन आता पुन्हा लांबवणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळाच्या परिसरात 86 इमारती आणि टेकड्यांवरील 79 उंच ठिकाणांसह 225 अडथळे आहेत. या अडथळ्यांचा विमानतळाच्या ऑपरेशनवर परिणाम होऊ शकतो, असेही हवाई प्राधिकरणाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. नवी मुंबई विमातळावरून होणाऱ्या टेक-ऑफची डेडलाईन पुन्हा हुकणार असल्याने नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या आणि ते सर्वच मुहूर्त हुकले. राज्य सरकारने 15 मे रोजी विमानतळाचे उद्घाटन होईल असे गेल्या काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र अचानक अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी विमानतळाच्या साईटला भेट दिली आहे आणि उद्घाटन जून महिन्यात होईल अशी घोषणा केली. जून महिना सुरू होण्यास 12 दिवसांचा कालावधी उरलेला असताना हवाई प्राधिकरणाने या विमानतळाचा वापर येत्या 6 ऑगस्टपर्यंत करू नये, अशी नोटीस वैमानिक विमान कंपन्यांना आणि काढली आहे. विमानांच्या लॅण्डिग आणि टेक-ऑफसाठी विमानतळावर सुविधा अपूर्ण असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विमानतळाच्या परिसरात 225 अडथळे आहेत. त्यामध्ये 86 इमारती, टेकड्यांवरील 79 उंच ठिकाणे, 23 पॉवर ट्रान्समिशन टॉवर, 12 मोबाईल टॉवर, 8 फ्लडलाइट पोल आदींचा समावेश आहे. या अडथळ्यांचे अचूक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. मात्र अद्यापपर्यंत हे नियोजन झालेले नाही. या सर्वच अडथळ्यांमुळे विमानतळाच्या ऑपरेशनवर मोठा परिणाम होणार आहे, याचाही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. विमानतळाच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश असल्याचे हिंदुस्थानच्या वैमानिक माहिती प्रकाशनमध्ये मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात धावपट्टीची लांबी, विमान पार्किंग आणि इंधन उपलब्धता यांसारख्या तपशिलांचा समावेश असला तरी दस्तऐवजात टेक-ऑफ किंवा लॅण्डिंग मार्गांची रूपरेषा देण्यात आली नाही.
…तर पुन्हा नोटीस काढणार
काम अपूर्ण असल्यामुळे येत्या 6 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा कोणत्याच परिस्थितीत टेक-ऑफ आणि लॅण्डिगसाठी वापर करण्यात येऊ नये, अशी नोटीस वैमानिक आणि विमान कंपन्यांना देण्यात आली आहे. जर 6 ऑगस्टपर्यंत विमानतळाच्या कामात सुधारणा झाली नाही तर पुन्हा नोटीस काढण्यात येणार आहे. ही नोटीस विमानतळाच्या भागधारकांनाही देण्यात येणार असल्याचे हवाई प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.