कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, सहा जणांचा मृत्यू

कल्याण पूर्व येथील सप्तश्रुंगी या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्त सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लाद्या बसवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी चौथ्या मजल्यावरील स्लॅब प्रत्येक मजल्यावरील स्लॅबला तोडत तळमजल्यावर आला. त्यात सहा जणांचे बळी गेले. प्रमिला साहू, नमस्वी शेलार, सुनीता साहू, सुजाता पाडी, सुशीला गुजर, व्यंकट चौहान अशी मृतांची नावे आहेत. तर विनायक पाडी, श्राविल शेलार, अरुणा गिरनारायण, यश क्षीरसागर, निखिल खरात, श्रद्धा साहू अशी जखमींची नावे आहेत.

घरमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या दुर्घटनेप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी चौथ्या मजल्यावरील घरमालक कृष्णा यादव याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.